Wednesday, April 26, 2017

मसालेभात

लग्नांचा season सुरु झालाय आणि लग्नातल्या जेवणाचा पण. असं समजा की तुम्हाला एका लग्नाचं बोलावणं आलं, वधू वराच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्ही तडक जेवणाच्या हॉल कडे वळता. तिथे तुमच्या सारख्या चतुर लोकांची आधीच  गर्दी उडालेली असते. गर्दी तुन वाट काढून तुम्ही एका बाजूला सरकता आणि तुम्हाला दिसतात ओळीत मांडलेली पानं आणि त्यात उरलेल्या दोन रिकाम्या खुर्च्या. तुम्ही पटकन त्यातली एक खुर्ची पकडता आणि स्वतःवरच खुश होत वाढप्यांची वाट बघता.

पानं वाढायला सुरुवात होते, मस्तपैकी बासुंदी, पुरीचा बेत असतो. तुम्हालाही सडकून भूक लागलेली असते, म्हणून बासुंदी वर आडवा हात मारायचे मनसुबे तुम्ही रचता. पण पुरीवाला वाढायला येतो तेव्हा फेरारी च्या वेगाने "पुरी... पुरी... पुरी... पुरी...." असं म्हणत तुम्ही "हो, चार" असं म्हणेपर्यंत दहा पानं पुढे पोहोचलेला असतो. जेमतेम एकदा त्याच्या भांड्यात उरलेल्या दोन पुऱ्या मिळवल्यावर तर तो बेपत्ताच होतो. त्याची वाट बघत तुम्ही आपलं बाकीचे पदार्थ संपवण्याच्या मागे लागता. शेवटी बराच वेळ वाट बघूनही तो येत नाही म्हणून तुम्ही मसाले भात वाढणाऱ्याला "हो" म्हणता. यजमानांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला काही कळायच्या आत तो तुमच्या पानात मसालेभाताचा डोंगर रचून पुढे निघून जातो. आता एवढा भात कसा संपवायचा हे संकट तुमच्यापुढे उभं रहातं.

तो डोंगर अर्धा पार केल्यावर अचानक पुरी वाला उगवतो आणि तुमच्या मनाची द्विधा अवस्था करून ठेवतो. तिकडे वाटीतली बासुंदी खुणावत असते आणि रस्त्यात अर्धा उरलेला मसालेभात वाट अडवून उभा असतो. अगोदरच आधीच्या अर्ध्या भाताने पोट तुडुंब भरलेलं असतं. पानात टाकलेलं बरं दिसत नाही म्हणून नेटाने उरलेला अर्धा भट तुम्ही संपवत असता, त्यात पूरी घ्यावी तर लोक अधाशी म्हणतील, वरून भात टाकावा लागेल तो वेगळा. म्हणून वाटीतल्या बासुंदीच्या खाणाखुणांनकडे दुर्लक्ष करून तुम्ही जड मनाने पूरी वाल्याला "नाही" म्हणता.

पोटातला भरता येण्यासारखा प्रत्येक कानाकोपरा मसालेभाताने भरून तुम्ही विजयी मुद्रेने एका हाताचा आधार घेत, जडावलेलं पोट सांभाळत उठता. तोपर्यंत हॉल मधली गर्दी कमी झालेली असते. हात धुवायला जातांना तुम्हाला लक्षात येतं कि जेवणासाठी पंगत आणि बुफ्फे अश्या दोन्ही व्यवस्था होत्या, आणि बुफ्फे मध्ये पाणीपुरी, दहीवडा, छोले टिक्की, लाईव्ह पाव भाजी काउंटर, पंजाबी, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, असे अनेक काउंटर्स होते आणि सहज मिळत असलेल्या पंगतीतल्या जागेसाठी तुम्ही हे सगळं घालवलंत पण तोवर वेळ निघून गेलेली असते, पोटात हवा शिरायला सुद्धा जागा उरलेली नसते. त्या सगळ्या काउंटर्स चे वास घेत, पोटातल्या मसालेभाताला सांभाळत तुम्ही हात धुवून तिथून बाहेर पडता.

आयुष्यं पण असंच काहीसं आहे. सजहपणे मिळतंय म्हणून आपण मिळत असलेली पहिली खुर्ची पकडतो आणि तिला  चिकटून बसतो. स्वप्नातली पूरी नशिबात नाही असं समजून मसालेभाताला "हो" म्हणून बसतो, आणि एकदम एक दिवस स्वप्नातली परी .... सॉरी... आय मीन पूरी अवचित आपल्या आयुष्यात अवतरते, पण तोवर मसालेभाताला शब्द दिलेला असतो, म्हणून आपण मसालेभाताशी निभावत बसतो. आणि आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं कि अरेच्या पूरी आणि मसालेभातापलीकडे देखील बघण्यासारखं, करण्यासारखं, चाखण्यासारखं बरंच काही होतं जे आपण सेक्युअर्ड खुर्ची पायी गमावून बसलो.
© गायत्री गद्रे


तुम्हाला आवडेल असं अजून काही - 


बुवा आहे तिकडे                                                                                                                   

4 comments:

 1. अतिशय सुंदर लिहिलंयत. हे वाचून अनेकांना अगदी आपलंसं वाटेल. हे सगळं कळतं अनेकांना, वळणंही शक्य असतं पण ती धमक फार कमी लोकांमधे जागृत असते. आपलं 'जग' उभं करायला जाताना माणूस
  आपल्यातली 'रग' मागे सोडून जातो. वेग वाढवंणं सोपं असतं, पण वाढलेल्या वेगात दिशा बदलणं कठीण. आणि वेग कमी केला तर हरायची भीती. मुळात शर्यतीच्या मानसिकतेतून बाहेरच येत नाहीत ९९% लोकं. असो.

  उत्तम लिखाण ! _/\_

  ReplyDelete
 2. छान मांडणी ! अर्थशास्त्र सांगत "resources are limited & human wants are unlimited". त्यामुळे मनात असुरक्षिततेची भावना, मग मिळतय ते पदरात पाडून घ्या ही मानसिकता! दुसऱ्याच्या ताटातल पक्वान्न पाहून आपण मग नशिबाला दोष देत मसालेभातच कसा योग्य हे स्वतःसह इतरांनाही पटवून देतो. लेख आवडला. माझे काही लेख bindubhure.blogspot वर आहेत.

  ReplyDelete
 3. Awesome....I am not very good at written Marathi so this comment in English. The comparison to life is so true. We often lose so much, just for the security of something which we actually don't want.
  Prasanna.

  ReplyDelete
 4. Good piece. U r right it takes looking ' beyond' and ability to take risk. On lighter note - I prefer to attend only those weddings where lunches / dinners are buffet & one can choose delicacies one likes, then occupy a secured seat.

  ReplyDelete