Monday, April 17, 2017

कूपमंडूक

काही दिवसांपूर्वी मला WhatsApp वर एक जोक आला. अमित फेसबुक वर मेसेज टाकतो कि ट्रम्प प्रेसिडेंट झाला, आता अमेरिकेचं आणि पर्यायाने जगाचं कसं होणार, त्यावर मिलिंद त्याला कंमेंट टाकतो, "तू शनिवार पेठेत राहतोस तिथे ३ दिवस पाणी येणार नाहीये, त्याची चिंता कर". आणि एकदम माझ्या डोळ्यांसमोर हरी अण्णा उभे राहिले.

कूपमंडूक! मला नक्की आठवत नाही मी हा शब्द पहिल्यांदा केव्हा ऐकला, पण त्याचा अर्थ नं कळण्याएवढी लहान होते एवढं नक्की. चौथीच्या scholarship परीक्षेच्या तयारीच्या वेळेस हा शब्द पुन्हा मला भेटला, आणि तेव्हा मला त्याचा खरा अर्थ कळला आणि अर्थ कळल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर हरी अण्णांचा चेहरा आला. त्यानंतर अनेक वर्ष कोणी कूपमंडूक म्हणालं कि माझ्या डोळ्यासमोर हरी अण्णा त्यांच्या घराच्या विहिरीतून आपलं बेडकासारखं डोकं बाहेर काढून, डोळ्यावरचा चष्मा सरसावून आजूबाजूला बघताहेत आणि नाकातून नापसंतीचा सूर काढून, तोंड वाकडं करून विहिरीतल्या त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर परत जाऊन आपलं दात कोरण्याचं काम पूर्ववत सुरु ठेवताहेत असं चित्र माझ्या नजरेसमोर यायचं.

तसं आमचं गाव एकदम लहान, त्यामुळे सगळे लोक ओळखीचे. जसजशी मोठी होत गेले तस तसं कुपमंडूकाचं चित्र बदलत गेलं. ते कधी वडिलोपार्जित घरात आणि दुकानात बरोब्बर मध्ये भिंत टाकून दोन्ही दुकानात हुबेहूब एकसारख्या गोष्टी विकणाऱ्या छगनलाल आणि मगनलाल सारखं दिसू लागलं तर कधी मुलाला शहरात जाऊ दिलं तर तो म्हातारपणी आम्हाला सांभाळणार नाही असं म्हणणाऱ्या शेवंताबाईंसारखं दिसायला लागलं. दहावी पास  करेपर्यंत तर त्या मंडूकाने विश्वरूप धारण केलं होतं. म्हणजे मला आमचं अक्ख गावच एक विहीर आहे आणि त्यात राहणारे आम्ही सगळे एक एक कूपमंडूक आहोत असा भास व्हायला लागला. आयुष्यात पहिल्यांदा "इथून बाहेर पडा , मोठे व्हा, इथे काही ठेवलेलं नाही" या आई बाबांच्या वाक्याचा अर्थ कळायला लागला.

कशी गंमत असते बघा ना, म्हणजे मला असं वाटायचं कि एकदा या गावाबाहेर पडलं कि विशाल जग भेटेल, जिथे लोकं कूपमंडूक नसतील, त्यांचे विचार संकुचित नसतील, शहरातले लोकं बऱ्याचदा गावाकडच्या लोकांना तुच्छ लेखतात (म्हणजे निदान माझ्या बघण्यात तरी असे शहरातले बरेच लोकं आले होते) म्हणजे त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन फार मोठा असेल असं वाटायचं. आणि या समजामुळे मी काही चमत्कारिक प्रसंगात पण अडकले. कॉलेज संपता संपता ९/११ चा अतिरेकी हल्ला झाला तेव्हा मी एका परिचितांच्या घरी बसले होते, बातम्या बघून माझा चेहरा चिंताक्रांत झाला, ते बघून ते काका मला म्हणाले होते "तुझा सक्खा भाऊ त्या ट्विन टॉवर मध्ये असल्यासारखा सुतकी चेहरा का केला आहेस? ते तिकडे अमेरिकेत चालले आहे, इथून लाखो मैल दूर". सगळं आयुष्यं पंख्यांच्या फॅक्टरी मध्ये घालवलेल्या काकांना मी कसं समजावणार कि अमेरिकेची इकॉनॉमी कोसळली तर भारतातली IT इंडस्ट्री पण खाली जाईल, आणि तसं झालं तर पुढच्या वर्षी कॉलेज मधून बाहेर पडल्यावर मला नोकरी मिळणार नाही. बराच वेळ प्रयत्नं केल्यावर मी नाद सोडला आणि त्यांच्या "बरं झालं, गोर्यांची बरी जिरली" या उत्सवात सामील झाले.

अजून एक असाच प्रसंग, कौन बनेगा करोडपती बघत असतांना तेच काका म्हणाले होते "सालं आपल्याला मिळायला पाहिजे एक करोड रुपये" उत्सुकतेने मी त्यांना विचारलं "मिळाले १ करोड तर काय कराल त्याचं?" त्यावर ते म्हणले "खूप दिवसांपासून स्वतःची कार घेऊन मुंबई फिरून यायची इच्छा होती, एक मारुती ८०० घेईन फर्स्ट क्लास, आणि अक्खा आठवडा मुंबई मध्ये चैन करेन, तसाही डोंबिवलीत माझा मावस भाऊ राहतो त्याचं घर आहेच, त्याच्याकडेच राहीन". मला हसावं का रडावं ते नं कळून, मी आपलं "अमिताभ बच्चन कसला भारी आहे ना या वयातही!" म्हणून मनातल्या मनात १ करोड मध्ये कुठल्या कुठल्या कार येतील याचा हिशोब करत परत TV  कडे तोंड फिरवलं,

तशीच गंमत माझ्या एका दूरच्या भावाची. तो मुंबई ला आला असतांना खास माझं ऑफिस बघायला म्हणून आला, security reasons साठी कंपनी कोणाही नातेवाईकांना ऑफिसच्या आत येऊ देत नाही हे सांगूनही. आता आलाच आहे तर माझ्या सोबत काम करणाऱ्यांची ओळख करून द्यावी म्हणून मी माझी प्रोजेक्ट मॅनेजर आणि २-३ टीम मेंबर्स ना घेऊन रिसेपशन मध्ये गेले. माझी प्रोजेक्ट मॅनेजर christian, केस छोटे कापलेले, आणि स्कर्ट घातला होता. तिने हॅलो केल्यावर याने तिला उत्तर देखील दिलं नाही, मलाच अवघडल्यासारखं झाला. वरून ती गेल्यावर मला म्हणाला, तुझा प्रोजेक्ट बदलून घे, नाहीतर पुढल्यावेळी तुही दिसशील  तिच्यासारखी, छोट्या कपड्यात.

असे नाना तर्हेचे कूपमंडूक मला आयुष्यात भेटत गेले आणि एक गोष्ट कळून चुकली, कि याचा जागेशी, विद्वत्तेशी किव्वा जवळ असलेल्या धनाशी काहीही संबंध नाही. काही लोक समोर खजिना पडलेला असतांना संपत्ती आली की माणसाचा कसा विनाश होतो हे बोलण्यात आयुष्य घालवतात तर काही दुसऱ्यांनाही त्या खजिन्याचा लाभ घेऊ देत नाहीत, तसे हे कूपमंडूक आजूबाजूला बघण्यासारख्या आणि अनुभवण्यासारखा लाखो गोष्टी असतांना, जन्माला येतांना घेऊन आले तेवढेच विचार आणि अनुभव पदराशी बांधून आयुष्य घालवण्यात धन्यता मानतात, आणि दुसऱ्यांनाही आयुष्य जगण्यापासून परावृत्त करतात. त्यांना कधी परकी भाषा शिकण्यातली गम्मत कळतंच नाही, ना कधी वेगळं काही अनुभवण्यातली मजा. जगातला सगळ्यात कुशल chef यांना आणून दिला तरी ते कैरीचं लोणचं miss करण्यात आनंद मानतील.

© गायत्री गद्रे

तुम्हाला आवडेल असं अजून काही - 


बुवा आहे तिकडे                                                                                                                   

No comments:

Post a Comment