Tuesday, July 5, 2016

बुवा आहे तिकडे




"भांडी घासायला एक बाई मिळाली असती तर वाट्टेल तेवढे दिवस मी आनंदाने इथे राहिले असते." नॅपकिन ला हात पुसत आई म्हणाली. लॅपटॉप मधून डोकं बाहेर काढत तेजस ने आई कडे पाहिलं, "तुला किती वेळा सांगितलंय डिश वॉशर लावत जा म्हणून." "अरे इन मीन ८-१० तर भांडी असतात, तेवढ्या साठी कशाला लावायचं डिश वॉशर? १० मिनिटात घासून होतात." तेजस ने मान हलवली आणि परत लॅपटॉप मध्ये डोकं घातलं. "बरं तेजस, पूर्वी कशी वाटली तुला?" आईच्या या शब्दांनी बाबांनी हातातला मोबाईल बाजूला ठेवला. "कोण पूर्वी?" तेजसने लॅपटॉप मधून डोकं ना काढता विचारलं. "अरे असं काय करतोस? नेहा च्या लग्नात नाही का भेटली तुला?" "हा, ती? टॅलेंटेड आहे. पण इकडच्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन मिळवायला खूप मेहनत करावी लागेल तिला. खूप कॉम्पिटीशन असते इथे. मी सांगितलं तिला, जॉब सोबत एक्झाम जमणार नाही तिला. त्यातून तिची कंपनी पण खूप डिमांडिंग आहे. जॉब सोडून एखाद वर्ष तयारी केली तर कदाचित मिळू शकेल ऍडमिशन."

"ऍडमिशन बद्दल नाही विचारत आहे मी. स्वभाव कसा वाटला तिचा? दिसायला छान आहे नाही? एकदम लाघवी आहे. बराच वेळ गप्पा रंगल्या होत्या तुमच्या.". आई च्या बोलण्याचा रोख लक्षात आल्यावर तेजस ने लॅपटॉप बाजूला ठेवला, "अर्ध्या तासात कुठे स्वभाव कळतोय. पण असेल चांगला. लग्नात बरेच जण ओळखत होते तिला. आणि आमच्या गप्पा नव्हत्या रंगल्या, तिला इथे MS करायला यायचं आहे, म्हणून ती मला युनिव्हर्सिटीज बद्दल विचारात होती एवढंच. तसंही तिथे तिच्याशिवाय माझ्या वयाचं कोणी नव्हतं बोलायला. मामांशी आणि आजीशी किती वेळ गप्पा मारणार?" "नेहाची  अगदी खास मैत्रीण आहे ती. मावशी सांगत होती की  लग्नाच्या तयारीत खूप मदत केली तिने. आवड पण केवढी चांगली आहे तिची. लग्नाच्या सगळ्या साड्या तिच्या सल्ल्याने घेतल्या नेहाने." "अच्छा" एवढच म्हणत तेजस ने पुन्हा लॅपटॉप मध्ये डोकं घातलं. "बाजूला ठेव बरं तो लॅपटॉप आधी. आम्ही आल्यापासून एक तर घराबाहेर तरी असतोस, नाहीतर लॅपटॉप मध्ये डोकं घालून." त्रासिक चेहरा करत तेजस ने लॅपटॉप बंद केला. "काय करू कामाची खूप गडबड आहे सध्या. अचानाकच २-३ गोष्टी नवीन आल्यात". "हे बघ, तुला मनासारखा  जॉब मिळाला आहे. कदाचित १-२ वर्षात तू इथे घरही घेशील. आता चांगला सेटल झाला आहेस. पुढे काय करायचं ठरवलं आहेस?" 

"बरं झालं विषय निघाला. मला तुमच्याशी जरा बोलायचंय". तेजस चं हे वाक्य ऐकून आईला जरा हुरूप आला, तर बाबांच्या मनात वेगळ्याच शंकेची पाल चुकचुकली.

"नेहा च्या लग्नातून इकडे परत येत असतांना मला फ्लाईट मध्ये एक माणूस भेटला. गप्पा गप्पांमध्ये मी त्याला माझ्या प्रोजेक्ट बद्दल सांगितलं. त्याला आयडिया खूप आवडली आहे. त्याचही मत आहे की, याला पुढे खूप पोटेन्शियल आहे. तो माझ्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करायला तयार झालाय. पण त्याच्यासाठी मला हा जॉब सोडून, पालो अल्टो ला जावं लागेल. सुरुवातीचे काही दिवस मला पगार नसणार आहे. पण तुम्ही काळजी करू नका. मी गेले २ वर्ष पैसे जमवतोय. निदान पुढचं एक ते दीड वर्ष नक्कीच पुरतील. तोपर्यंत बिजिनेस पिकअप होईल असा अंदाज आहे आमच्या दोघांचा. गेले काही दिवस त्याच गडबडीत आहे मी, म्हणून तुम्हाला फारसा वेळ देऊ शकलो नाही." तेजसने आई बाबांना श्वास घ्यायलाही वेळ नं देता एका दमात सगळं सांगून टाकलं.

"अरे पण तू ते पैसे घर घेण्यासाठी जमवत होतास ना? आणि समज नाही चालला हा तुमचा बिजिनेस तर?" आई ने शंका काढली. "नाही चालला तर जॉब ला परत जाईन मी. माझ्या कंपनी मध्ये १ वर्षाचा ब्रेक घेता येतो. सध्या ब्रेक घेऊन काम सुरू करेन. १ वर्षात जर वाटलं की नाही चालणार तर हाच जॉब परत कंटीन्यू करेन." "पण त्याच्यात तुझं एक वर्ष वाया नाही का जाणार? तूच  म्हणाला होतास ना की इकडे प्रोमोशन due आहे म्हणून. ते नाही का जाणार हातातून?" आई च्या शंका सुरूच होत्या. "प्रोमोशन चं काय आहे, आत्ता आत्ता नाहीतर २ वर्षांनी मिळेल, त्यात काय एवढं." "आणि घराचं काय? घरासाठी पुन्हा पहिल्यापासून पैसे जमावावे लागतील" "जमवेन की मग. त्यात काय विशेष!" "म्हणजे पुढचे ३-४ वर्ष तरी तुझं घर होत नाही" "तसाही एकटाच राहतोय. वीकेंड्स ना मित्रांसोबत बाहेरच असतो. घर घेऊन त्यात राहणार आहे कोण? आणि तूच नव्हतीस का सांगत की तुमच्या वेळेस रिटायर झाल्यावर घर घ्यायचे. मी तर फक्त ३-४ वर्षानेच पुढे ढकलतोय." "अरे तसं नाही, लोक विचारतात, म्हणून म्हटलं." "लोकांना काय करायचंय मी कुठे राहतो ते. त्यांच्या घरी जाऊन राहतोय का मी. तुझं आपला काहीतरीच." तेजस वैतागला. 

"हे बघ, तुझा चांगला जॉब आहे. लवकरच प्रोमोशन होईल, स्वतःचं घर होईल. चांगला सेटल आहेस. कशाला उगाच बसलेली घडी मोडतो आहेस. लोक विचारतात आम्हाला, लग्न कधी करणार म्हणून. मला पूर्वी फार आवडलीये. पण तुला जर कोणी दुसरी आवडली असेल तर तसं सांग, आमची काही हरकत नाही. अगदी अमेरिकन असली तरी चालेल." 

"लग्न? आई अगं  मी इथे सांगतोय की पुढचे २-३ वर्ष मला माझ्या खर्चाचे वांदे होणार आहेत. लग्न करून बायको ला काय खाऊ घालू? मला अजून ३-४ वर्ष तरी लग्न करायचं नाहीये." "अरे असं काय करतोस, लग्नाचं वय निघून चाललंय तुझं. लोकं विचारतात सारखे आम्हाला." "पुन्हा लोकं! कोण आहेत हे लोक, मलाही जरा कळू दे, ज्यांना त्यांची मुलं  सोडून माझी काळजी पडली आहे." "एकदा वय निघून गेलं की चांगली मुलगी मिळणार नाही. सतत स्थळं येताहेत आमच्याकडे. तुझ्या बरोबरीच्या सगळ्यांची लग्न झालीत. राघव कडे तर बातमी पण आहे. आम्हाला नाही का वाटत, तुझंही लग्न व्हावं, सून यावी, नातवंडं खेळवावीत."  "आई थांब जरा, लगेच नातवंडांपर्यंत पोहोचू नकोस. मला अजून ३-४ वर्ष तरी लग्न करायला जमणार नाही. आणि झाली असतील माझ्या सगळ्या मित्रांची लग्न. म्हणून काही मी म्हातारा झालो नाहीये. ते सगळे त्यांच्या जॉब्स मध्ये समाधानी आहेत, म्हणून केलं त्यांनी लग्नं, त्याची शिक्षा मला का? मला या जॉब मध्ये  काम करायला मजा येत नाहीये. एवढे दिवस शांत बसलो होतो कारण इन्व्हेस्टर शोधायला जाण्याची हिम्मत नव्हती. पण आता समोरून संधी चालून आली आहे, तर ती का सोडू?" "अजून ३-४ वर्षांनी तू ३३ वर्षाचा होशील, त्याच्यापुढे मुलं, तू रिटायर होण्याआधी मुलं सेटल कसे व्हायचे? आणि आमचा पण तर विचार कर. अजून ४-५ वर्षांनी आमच्यात एवढी ताकद हवी, सुनेचं बाळंतपण करण्याची, नातवंडं सांभाळण्याची." "नका करू बाळंतपण, आम्ही आमचं मॅनेज करू. मी माझं आयुष्यं तुमच्या टाईम टेबल प्रमाणे जगायचं का?" 

"बरोबर आहे, आता आमची काय गरज तुला? तुझं आयुष्यं आहे, तुझं तू मॅनेज कर. नातवंडं झाल्याचा कळवा म्हणजे झालं. जमलं तर एखादा फोटो पाठवा, त्यावर समाधान मानू. चुकलंच आमचं इथे आलो. " म्हणत आई ने डोळ्याला  पदर लावला. 

एवढा वेळ शांतपणे सगळं ऐकत असलेले बाबा आता मध्ये पडले. "हे बघ तेजस, तू या माणसाला किती ओळखतॊस? तो तुला फसवणार नाही कशावरून?" "बाबा, त्याने आधी पण काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेन्ट केली आहें, त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. आत्तापर्यंत त्याने इन्व्हेस्ट केलेले  ९०% ventures successful झाले आहेत. हे सगळं चेक करूनच मी एवढा मोठा निर्णय घेतला." "असेल त्याचा success rate चांगला, पण १०% मध्ये तुझी आईडिया नसेल कशावरून? तूला आत्ता काय कमी आहे? चांगली नोकरी आहे, चांगल्या मुली सांगून येताहेत, लग्न कर, सेटल हो. हातचं सोडून पळत्यामागे कशाला धावायचं?" "पण बाबा, मला जॉब सॅटिसफॅक्टशन  मिळत नाहीये. आणि माझ्या प्रोजेक्ट मध्ये दम आहे. रिस्क घेतल्याशिवाय यश कसं मिळेल?" "तुला मिळालं तेवढं यश भरपूर आहे. शिकायला इथे आलास, स्वतःच्या जोरावर एवढ्या मोठ्या कंपनीत जॉब मिळवलास. लोकं हेवा करतात तुझा. जॉब सॅटिसफॅक्टशन कुठल्या जॉब मध्ये असतं? आम्ही आयुष्यभर नोकरी केली ती जॉब सॅटिसफॅक्टशन साठी नाही, तर मिळणाऱ्या नावासाठी, पगारासाठी. आपण साधे नोकरी करणारे  middle class लोकं, बिसिनेस वगैरे आपल्याला नाही जमत. छान नोकरी करायची, संध्याकाळी वेळेत घरी यायचं, बायको मुलांसोबत रमायचं, याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? मला तरी या तुझ्या विचारात तथ्य वाटत नाही. पुन्हा एकदा विचार कर." बराच वेळ कोणीच काही बोललं नाही, आईचं मुसमुसणं चालूच होतं. शेवटी बाबा म्हणाले "चला झोपूया आता. उद्या सकाळी लवकर निघायचंय रोहित कडे जायला."

तेजस सकाळी तयारी करून हॉल मध्ये वाट बघत बसला होता. आई बाबांची आवरा आवरी सुरू होती. शेवटी एकदाचे बॅग घेऊन बाबा बाहेर आले. "एवढं  काय सामान आहे, ३ दिवसांसाठी तर जाताय." तेजसने विचारलं. "रोहित साठी खाऊ दिला आहे आत्याने, आणि आई ने पण बराच खाऊ आणलाय त्याच्यासाठी. शिवाय त्याच्या मुलीला पहिल्यांदाच बघणार आहोत, तेव्हा तिच्यासाठी गिफ्ट्स पण आहेत." बाबा म्हणाले. आई काल  पासून शांत होती, तिचं नं बोलणं तेजस ला अस्वस्थ करत होतं. "तुम्हाला ट्रेन मध्ये बसवल्यावर मी रोहित ला फोन करेन, तो येईल तुम्हाला घ्यायला स्टेशन वर. तुम्हाला मॅप काढून दिला आहे, पण तरीसुद्धा कुठे डाउट वाटला तर रोहित ला फोन करा, स्टेशन खूप मोठं आहे, तिथे हरवायला होतं." तेजस आई कडे बघत म्हणाला, आई ने उत्तरादाखल मान हलवली. "मी परवा संध्याकाळी परत येईन, आलो की फोन करेन". नं राहवून शेवटी आई ने विचारलं "तुला कॅन्सल नाही का करता येणार?" "आई मी ६ महिन्यांपूर्वी बुकिंग केलं होतं, तुमचं यायचं ठरण्या आधी. आता कॅन्सल केलं तर सगळे पैसे जातील. शिवाय तुम्हाला केव्हा तरी रोहित कडे जायचंच होतं ना, मग आत्ताच जाऊन या. मी येतोच आहे ना परवा तुम्हाला घ्यायला." "आमच्या जाण्याचं काही नाही रे, पण तू आता हे सगळे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स जरा बंद कर. आमचा जीव उगाच टांगणीला लागतो. काय गरज आहे, एवढे पैसे खर्च करून स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची? उद्या तुला काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं." "तू काळजी करू नकोस, सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेतात ते. काही होणार नाही मला" "मी बघितलंय TV वर, विमानातून खूप उंचावर नेतात आणि पॅरॅशूट लावून खाली उडी मारतात. एकदा एका माणसाची पॅरॅशूट उघडली नाही, फॉल्टी होती, गेला ना तो! आणि तू उडी मारशील त्याच वेळेस एखादं विमान तिथून जात असेल तर? आणि खाली कुठे समुद्रात वगैरे पडलास तर? जास्त उंचावर जाऊ नकोस, थोडा कमी वेळ हवेत राहिलास तर काही बिघडत नाही, कमी उंचीवरून उडी मार" आईचं चालूच होतं. "उद्या हात पाय मोडले तर कोणी मुलगी मिळणार नाही." आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी लग्नावरच येऊन कश्या संपतात हे तेजस ला कधीही नं उलगडलेलं कोडं होतं. शेवटी बाबानी पुरे आता अशी खूण  केली आणि आई गप्पं बसली. 

ट्रेन मध्ये खूप गर्दी होती, जेमतेम आई ला बसायला जागा मिळाली. ३-४ स्टेशन्स गेल्यावर जरा पलीकडे बाबांना बसायला जागा मिळाली. बाबानी बॅगेतून काल घेतलेलं Architectural Digest काढलं. त्याच्या कव्हर इमेज वर Notre Dame cathedral चा फोटो बघून त्यांनी ते घेतलं होतं, स्पेशल फ्रेंच architecture issue होता तो. फ्रेंच architecture, बाबांच्या जिव्हाळ्याचा विषय. मॅगझीन वाचण्यात बाबा मग्न झाले होते. "Oh! you are interested in France?" बाबांनी दचकून बाजूला बघितलं, तर एक विशीतली मुलगी येऊन त्यांच्या बाजूला बसली होती. बाजूचा मुलगा उठून गेल्याचं त्यांना कळलंच नव्हतं. बोलतांना कळलं की ती मुलगी फ्रेंच होती, नाव Lucy . शिक्षणात १ वर्षाचा ब्रेक घेऊन ती जग बघायला निघाली होती. अमेरिका कव्हर करून आशिया मध्ये जाण्याचा तिचा विचार होता. बाबांना गम्मत वाटली. तिकिट, राहण्याचं बुकिंग, कशाचा पत्ता नाही, कोणी ओळखीचं नाही. बॅग उचलायची आणि निघायचं. मनाला वाटेल तेवढे दिवस राहायचं, मनाला वाटेल तेव्हा बॅग भरून चालू लागायचं. इच्छा होईल त्या स्टेशन वर उतरायचं, आजू बाजूला एकटीनेच हिंडायचं आणि पुन्हा पुढची वाटचाल सुरू करायची. जवळ पैसे फार नाही. मिळेल ते काम करायचं, त्या बदल्यात पैसे, राहण्याची जागा किव्वा जेवण काहीही चालायचं.

वयाने लहान असून सुद्धा तिला बरीच माहिती होती, वेगवेगळ्या देशातील culture, प्रथा, architecture, भाषा वैशिष्ट्य, भौगोलिक वैशिष्ट्य आणि बरंच काही. फ्रान्स तर तिने अक्षरशः पिंजून काढला होता. फ्रान्स बद्दल आणि विशेषतः तिथल्या जुन्या Chateaus, Museums आणि Cathedrals बद्दल तिच्याकडून ऐकण्यात बाबा तल्लीन झाले होते. आईच्या आवाजाने त्यांची तंद्री मोडली. तिच्या बाजूला बसायला जागा झाली होती, आणि ती बोलावत होती. "नको आता, इथेच बसतो" असं म्हणत बाबा पुन्हा Lucy कडे वळले. तेवढ्यात आईच्या कपाळावर पडलेल्या आठ्या त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत, पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं.

त्यांना तिच्या आई वडिलांचं विशेष आश्चर्य वाटलं, तरुण मुलगी अनोळखी देशात एकटीच फिरतेय, रात्री झोप कशी लागत असेल त्यांना. हे विचारल्यावर ती अगदी सहजतेने म्हणाली "My parents told me, 'Life is to be lived. Dont settle in a bubble for rest of your life. Travel as much as you like, see every city and every corner of this world, there is so much to see, to experience. Marry only when you meet a guy you can't live without, and stay in a place you can't imagine to part with. Dont settle for anything less than the best for you. Marriage, kids are  just a part of life not the ultimate goal of life'".

Lucy उतरून गेल्यावर बाबा खिडकीतून भरवल्यासारखे तिच्याकडे पाहत राहिले. "गेली ती आता, जमिनीवर या" आई च्या वाक्क्याने बाबा दचकले, Lucy च्या जागेवर ती येऊन बसली होती. "आपलं वय तरी बघा, मुलाच्या वयाची आहे ती तुमच्या" आई नाक वाकडं करत म्हणाली, "तेजस पेक्षा लहान आहे वयाने, पण अनुभवाने आपल्या पेक्षाही मोठी आहे" आईचं वाक्य तोंडत बाबा  म्हणाले. "कुठल्या मुहूर्ताला अमेरिकेला आले कोणास ठाऊक, तिकडे मुलाचं एक, तर इकडे यांचं दुसरंच." आई पुटपुटली आणि शांत बसली. अनाहूतपणे बाबांचा हात मांडीवरच्या Notre Dame वरून फिरला.


"आई तू सांग ना अण्णांना " मोहन आई च्या मागे उभा राहून तिचा हात हलवत म्हणाला.  "आहे काय मेलं असं फ्रान्स च्या building मध्ये. इथून तिथून सगळ्या बिल्डींग्सच ना? त्याच्यासाठी एवढ्या दूर कशाला जायला हवंय? इथे पण आहेत Architecture colleges. तिथली भाषा माहिती ना लोक, जेवणार काय, राहणार कुठे? साधं पाणी सुद्धा मागता येणार नाही तुला त्यांच्या भाषेत."   "मी शिकेन त्यांची भाषा, एवढी काही कठीण नाहीये . आणि कॉलेज मध्ये बाकीच्या देशातले पण बरेच स्टूडेंट्स असतील, ते बोलतील इंग्लिश मध्ये. " मोहन  इरेला पेटून बोलला. "तूला इंग्लिश तरी कुठे नीट बोलता येतंय? अरे ते मांस खातात, आपल्या सारख्यांना खायला तिथे काहीही मिळत नाही म्हणे. आणि खूप थंडी असते, वर्षातले बरेच महिने तर बर्फचं असतो. आपले गोपूकाका गेले होते एकदा लंडन ला, ते सांगत होते." आई समाजावणीच्या सुरात म्हणाली. "गोपूकाकांना काय कळतंय, ते मोजून १५ दिवस होते तिथे. आणि लंडन इंग्लंड मध्ये आहे, मला फ्रान्स ला  जायचंय, हे दोन्ही वेगळे देश आहेत." "वेगळे असले तरी जवळच आहेत, तिथे काही फार वेगळी परिस्थिती नसेल. २ बहिणींमागे नवसा  सायासाने झालेला एकुलता एक मुलगा आहेस तू आमचा, तुला काही झालं तर आम्ही कोणाचं तोंड बघायचं ? तुला  जे शिकायचंय ते इथल्या कॉलेज मध्ये पण शिकवतात, काही गरज  नाही  एवढ्या लांब जायची." "आई पण इथे फ्रान्स ची हिस्टरी नाही शिकवत. मला फक्त architecture  नाही , त्यांची हिस्टरी पण शिकायचीय." "बिल्डींग्स बांधायला हिस्टरी कशाला लागते. हिस्टरी शिकून काही होत नाही, प्राथमिक शाळेत इतिहासाच्याच्या शिक्षकांची नोकरी मिळते फार तर फार." आई ने विषय संपवला . बाबांना साकडं घालण्यासाठी आई ला पेटवण्याचे प्रयत्नं फसले होते. आता मोहन ला स्वतःच अण्णांना सामोरं जाणं भाग होतं . 

संध्याकाळी अण्णा दुकानातून घरी आल्यावर, त्यांनी मोहन ला आवाज दिला "काय ठरलं मग तुझं? इंजिनीरिंग ची ऍडमिशन अजूनही आहे,  पण तुझा हट्टच असेल तर जा architecture ला . मी मोनेंशी बोलून ठेवलंय , उद्या सकाळी फी चे पैसे घेऊन जा " "बाबा, पण  मला फ्रान्स ला शिकायचंय architecture" मोहन ने  शेवटचा प्रयत्न करून बघितला, "हे बघ मोहन, तू कधी घर सोडून राहिला नाहीस, तुला कधी  एकट्यानं गावी सुद्धा पाठवलं नाही आम्ही, एवढ्या  दूर  विमानाने एकटा कसा पाठवणार. तुला वाटतं तेवढं सोपं नाही बाळा  ते. तिथे भाषा नवीन, लोक नवीन, तुझ्या खाण्याचे हाल होतील, आजारी पडलास, काही दुखलं खुपलं तर कोणी काळजी घ्यायला नाही. इथलं कॉलेज सुद्धा चांगलं आहे, तुला चांगली नोकरी मिळेल, आपल्या जोशींच्या सचिन ने पण त्याच कॉलेज मधून architecture केलं , मोठ्या कंपनीत नोकरी आहे त्याला आता. एवढ्या लांब जाऊन तू काय साध्य करशील? हे सगळं श्रीमंत लोकांसाठी ठीक आहे, आपण अंथरून पाहून हात पाय पसरावे.". "पण बाबा मी scholarship मिळवेन, तुमचा खर्च नाही वाढवणार. " "एवढं  सोपं असतं scholarship  मिळवणं तर सगळेच नसते का गेले तिकडे शिकायला. तुला वाटतं ते सोपं, पण अवघड आहे खूप. उद्या माझ्याकडून फी चे पैसे घेऊन जा आणि मोन्यांना  भेट. तुझा हट्ट आहे म्हणून मी architecture साठी तयार झालोय, जास्त डोक्यावर बसायला लागलास तर तेही मिळणार नाही. इंजिनीरिंग करायला लावेन, कळलं ?"

"अहो चला दारापाशी उभे राहू, तेजस ने सांगितलं होतं, एक स्टेशन आधीच दाराच्या जवळ जाऊन उभे राहा." आई च्या वाक्याने बाबा वास्तवात आले. खिडकीतून Lucy कडे बघता बघता, भूत काळात कधी हरवले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. आई ने भानावर आणल्यावर, काही क्षण त्यांना अण्णा खिडकीतून त्यांच्याकडे बघत असल्याचा भास झाला. त्यांनी दचकून पुन्हा नीट बघितला, एवढा वेळ खिडकीत दिसणाऱ्या स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे ते बघत होते.

दारात उभे राहून जवळ येत असलेल्या प्लॅटफॉर्म कडे बघत ते आई ला म्हणाले, "तेजस ला जे हवंय ते करू दे. नाही झालं त्याचा लग्न अजून ४-५ वर्ष तरी काही बिघडत नाही ." आई निशःब्दपणे त्यांच्याकडे बघत राहिली. 

13 comments:

  1. U r an amazing story teller...gud read:)

    ReplyDelete
  2. Khup chaan, goshta pan ani sadarikaran pan

    ReplyDelete
  3. This is very good, Gayatri! Super proud of you! You should write more..

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Maitreyee, I have started writing more often, hope to keep up

      Delete
  4. Gayatri, Good job on a story👌👌

    ReplyDelete
  5. उत्तम आणि उत्सुकतावर्धक मांडणी! लिहीत रहा गायत्री!☺

    ReplyDelete
  6. उत्तम आणि उत्सुकतावर्धक मांडणी! लिहीत रहा गायत्री!☺

    ReplyDelete
  7. 'चुकुन सापडलेले ब्लॉग सगळ्यात चांगले असतात' ह्या माझ्या मताला पुष्टी मिळाली. फारच सुंदर कथा. एका ब्लॉगवर थांबणं शक्य नाही. आता मी हे खणत जाणार.

    ReplyDelete